हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर आता केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे. बिपिन रावत यांचा मृत्यू झाल्यापासून हे पद रिक्त होते. लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील.
संरक्षण मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे, भारत सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली. याशिवाय ते भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील.
लेफ्टनंट जनरल चौहान यांनी 1981 ते 2021 या काळात लष्करात महत्त्वाच्या पदांवर काम केले. 40 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर ते 31 मे 2021 रोजी लष्कराच्या पूर्व कमांडच्या प्रमुख (जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ) या पदावरून निवृत्त झाले. पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून लेफ्टनंट जनरल चौहान यांच्या कार्यकाळात ईशान्येकडील भागात दहशतवादात मोठी घट झाली. त्यांच्या नेतृत्वाखालील ईस्टर्न कमांडने भारत-चीन सीमेवर राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्याचे धैर्य दाखवले. .
गतवर्षी हेलिकॉप्टर अपघातात झाला होता बिपिन रावत यांचा मृत्यू –
जनरल बिपिन रावत यांचा 1 डिसेंबर 2021 रोजी कुन्नूर, तामिळनाडू येथे दुपारी 12.20 वाजता हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. ते देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात CDS होते. त्यात जनरल रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह लष्करातील 14 जण होते. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला.