हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | १०० कोटींच्या मनी लॉंद्रीप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 3 दिवस ईडी कोठडीत वाढ करण्यात आली असून 15 नोव्हेंबरपर्यंत त्यांना ईडी कोठडीत ठेवण्याचे निर्देश कोर्टानं दिले आहेत
मला आता ईडी कोठडी देऊ नका अशी विनंती अनिल देशमुख यांनी न्यायालयाला केली. अनिल देशमुखांनी म्हटलं, माझा 25 जूनला जबाब नोंदवला गेला. धाडी टाकल्या त्या दरम्यान देखील माझी चौकशी केली गेली. मी स्वतःहून इडी चौकशीला आलो. अटक होण्याआधीपर्यंत मी या प्रकरणात आरोपी नव्हतो. आता 10 दिवस माझी कोठडी झालीये. मला खूप प्रश्न विचारले गेलेत. इतकी वेळ माझी चौकशी केली गेली तरीही मी चौकशीला सहकार्य करत नाही असं खोटं सांगितलं जातंय.
काय आहे प्रकरण-
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते.
ईडीने पाच वेळा समन्स बजावूनदेखील अनिल देशमुख आले नव्हते. अनिल देशमुख यांच्याकडून कायदेशीर मार्ग अवलंबण्यात येत होते. त्या दरम्यान ते अज्ञातवासात होते. अखेर काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर 13 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली होती.