हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडी च्या रडारावर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा दोघांना ईडीने बेड्या ठोकल्या.
अनिल देशमुख आणि काही इतर व्यक्तींच्या विरोधात ईडीनं गेल्याच महिन्यात मनी लाँड्रिंग कायद्याच्या अंतर्गत एक गुन्हा दाखल केला होता. सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून एका गुन्ह्याची नोंद करत सुरुवातीचा तपास केला होता. त्यानंतर ईडीनं गुन्हा नोंदवला.
दुसरीकडे तळोजा कारागृहातून निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचाही जबाब नोंदवण्यात आला. तसंच ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचेही जबाब नोंदवल्याचं कळतंय. सुमारे 10 ते 12 बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. या बार मालकांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. त्याच अनुषंगाने आता ईडीची कारवाई सुरु असल्याची माहिती आहे.