कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
विंग येथील गायरान जागेतील अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा मारला. दोन जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीने पाच तासाच्या कारवाईत अतिक्रमणे जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे संतप्त अतिक्रमण धारकांनी जनावरे चक्क ग्रामपंचायतीच्या दारात बांधली. त्यामुळे गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते.
विंग येथील गावठाणात नऊ हेक्टर 58 आर जागेत गायरान आहे. यामध्ये काही ग्रामस्थांनी अतिक्रमणे केल्याचे निदर्शनास आले होते. अनधिकृतपणे जनावरांची शेड उभारली होती. या विरोधात ग्रामपंचायत स्तरावर अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा संबंधितांना बजावण्यात आल्या होत्या. मात्र, काहींनी ग्रामपंचायत विरोधात न्यायालयात धाव घेत दावा दाखल केला होता. तेव्हापासून अतिक्रमणाचा प्रश्न चिघळला आणि चर्चेत आला. त्यानंतर प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या मदतीने संबंधितावर बेधडक कारवाईची मोहीम राबवली. तत्पूर्वी संबंधितांना रीतसर नोटीस बजावल्या होत्या. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास दोन जेसीबी, ट्रॅक्टर महसुलाधिकारी, पोलीस प्रशासन व त्यांच्या कर्मचाऱ्यांचा लवाजमा विंग येथे दाखल झाला.
यावेळी अतिक्रमण धारकांनी प्रशासनाशी हूज्जत घातली, विरोध दर्शवला. मात्र प्रशासनाने कारवाई सुरू ठेवत 28 जनावरांच्या शेडवर हातोडा टाकला. काहींनी स्वतःहून शेड काढून घेतली. सदरची कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळे दुरक्षेत्रच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा दूधभाते, संग्राम फडतरे, गणेश वेदपाठक यासह महसूल विभागाचे नायब तहसीलदार युवराज पाटील, मंडल अधिकारी डी. सी. दीक्षित, आर. आर. डहाणे, तलाठी फिरोज आंबेकरी, ग्रामविकास अधिकारी किसन रॉगटे आदींचा सहभाग होता.
दरम्यान, कारवाईनंतर संतप्त अतिक्रमण धारकांनी जनावरे थेट ग्रामपंचायतसमोर आणून बांधली व आम्हाला न्याय मिळावा असा आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सरपंच शुभांगी खबाले आणि किसन रोंगटे पोलीस प्रशासनाच्या वतीने रेखा दूधभाते आणि अतिक्रमणधारकात उशिरापर्यंत चर्चा सुरू होती