सातारा | पुणे- बंगळूर महामार्गावर सातारा शहराजवळ असलेल्या वळसे गावाजवळ आज शनिवार दि. 11 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास टॅव्हल्सचा अपघात झाला. ट्रव्हल्स चालकांचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही, मात्र ट्रव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे. काल रात्री कराडजवळ तर त्यानंतर पहाटे साताऱ्याजवळ दुसऱ्या ट्रव्हल्सचा अपघात झाला आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून कोल्हापूरच्या दिशेला ट्रव्हल्स निघालेली होती. सातारा शहराजवळ असलेल्या वळसे गावाजवळ हा अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने ट्रव्हल्स महामार्गावर असलेल्या दुभाजकांच्या मध्यभागी जावून अडकली होती. ट्रव्हल्समध्ये प्रवाशांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र ट्रव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी सोहेल सुतार, अजित सुतार यांच्यासह बोरगाव पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ट्रव्हल्स घटनास्थळावरून बाजूला हटविलेली आहे.
सध्या एसटी बस कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्याने प्रवाशी वाहतूक खासगी ट्रव्हल्समधून सुरू असून स्पर्धा सुरू असल्याचे दिसत आहे. ट्रव्हल्स चालकांच्या स्पर्धेमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. शुक्रवारी रात्री 11. 15 वाजता कराडजवळ नांदलापूर फाटा येथे ट्रव्हल्स चालकांने चुकीच्या पध्दतीने एका स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली होती. या अपघातात स्विफ्ट कार जवळपास 200 फूट लांब फेकली गेली. स्विफ्ट कार चालकांच्या प्रसंग सावधानामुळे हॅण्ड ब्रेक लावल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. तर 7 तासांत याच महामार्गावर सातारा शहराजवळ वळसे येथे आज पहाटे ट्रव्हल्स चालकाने दुभाजकांच्या मध्ये गाडी घातली आहे. ट्रव्हल्स चालकांच्या या स्पर्धेमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत आहे. तेव्हा या ट्रव्हल्स चालकांवरही चाप बसविणे गरजेचे असल्याची भावना प्रवाशी व्यक्त करत आहेत.