नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाने आत्महत्या केली आहे. दिलीप दयाराम रौंदळ असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मृत दिलीप दयाराम रौंदळ यांची मुलगी प्रणाली दिलीप रौंदळ यांच्या तक्रारीवरून आडगाव पोलीस ठाण्यात अरुण बोधले, विजय लहामगे, चंदेश लोढया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
दिलीप रौंदळ यांनी संशयितांकडून व्याजाने पैसे घेतले होते. यानंतर त्याने दिलीप रौंदळ यांच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता. या पैशांसाठी त्याने रौंदळ यांचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्यामुळे दिलीप रौंदळ यांनी या जाचाला कंटाळून मिर्ची हॉटेल चौकाजवळ खुशाल ट्रान्सपोर्ट, औरंगाबाद रोडे येथे विष प्राशन करून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अजून कोणालाही अटक केलेली नाही.
काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून नीलेश बाळासाहेब सोनवणे या 30 वर्षीय तरुणानेही आत्महत्या केली होती. सातपूर अशोकनगर भागातील नीलेश सोनवणेला आर्थिक चणचण होती. त्यामुळे खासगी सावकार निखिल भावले याच्याकडून 10 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी भावलेने गेल्या कित्येक दिवसांपासून नीलेशमागे तगादा लावला होता. तो त्याच्याकडे सतत पैशाची मागणी करायचा. अपशब्द उच्चारायचा. यामुळे नीलेश टेन्शनमध्ये होता. मात्र, सावकार भावले याने नीलेशची दुचाकी ओढून नेली. त्यामुळे नीलेश नैराश्यात गेला. यानंतर निलेशने याच नैराश्यातुन आत्महत्या केली होती.