माजलगाव : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यामुळे ठिकठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे देशांच्या अर्थव्यवस्थेपासून ते सामान्य लोकांचे घरातील अर्थिक बजेट पार कोलमडले आहे. या कोरोनाच्या महामारीत अनेक जणांच्या रोजगार जाऊन ते बेरोजगार झाले आहेत. तसेच अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. यामुळे अनेक लोकांना घराचं, व्यवसायाचे भाडे देणेदेखील शक्य नाही आहे. यामुळे अनेक जण कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. या कर्जाच्या ओझ्याला कंटाळून अनेक जण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे.
अशीच एक घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी घडली आहे. यामध्ये एका हॉटेल चालकाने आर्थिक नैराश्यातून आत्महत्या केली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे हॉटेल बंद ठेवावे लागले होते. त्यामुळे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह कसा करायचा? आणि हॉटेलचं भाडं कसं द्यायचे या सगळ्या चिंतेतून नैराश्यात गेलेल्या हॉटेल चालकाने हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आत्महत्या केलेल्या हॉटेलचालकाचे नाव सुरेश तुकाराम सुपेकर असे आहे. ते बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील रहिवासी आहेत. सुरेश तुकाराम सुपेकर हे मागच्या 20 वर्षापासून भाड्याच्या जागेत हॉटेल व्यवसाय करत आहेत. पण लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांच्यावर कर्जाचे ओझे मोठ्या प्रमाणात वाढले होते. यामुळे सुपेकर यांनी नैराश्यातुन सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.