दहशतवादी विरोधी पथकाच्या छाप्यात तब्बल 103 किलोचा जिलेटीनच्या स्फोटकांचा साठा जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोविंदसिंह बाळुसिंग राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे, ता. पाटण) या राजस्थानी व्यापार्‍याच्या घरावर छापा टाकला. त्यात तब्बल 103 किलोंच्या जिलेटीनच्या स्फोटकांचा साठा जप्त करण्यास दहशतवादी विरोधी पथकाला यश आले. विहिरीच्या खुदाईसाठी वापरल्या जाणार्‍या जिलेटीनच्या कांड्याचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रजपूत सहा वर्षांपासून तारळ्यात आहे. तो मूळचा राजस्थानचा आहे. विहीर खुदाईसाठी भागात ब्लास्टिंगचा त्याचा व्यवसाय आहे. त्याच्याकडे विहीर खुदाईचा परवानाही आहे. त्याने भागात अनेक विहिरींच्या खुदाईसाठी ब्लास्टिंग केले आहे. ब्लास्टिंगचा परवाना असला, तरी जिलेटनचा साठा करण्याची परवानगी घेतलेली नाही, तरीही त्याने साठा केला होता.

जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना त्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस प्रताप पाटील, उंब्रजचे सपोनि अजय गोरड अशा वेगवेगळ्या पथकाने तारळ्यात थेट छापा टाकून कारवाई केली. गोविंदसिंह याच्या घरावर पोलिसांचा छापा टाकला. त्याच्या घराची झडती घेतली असता घरात काहीही सापडले नाही. मात्र, त्याच्या घरामागील वापरात नसलेले स्वच्छतागृह पोलिसांनी उघडले असता त्यात 826 जिलेटिनच्या कांड्यांचा साठा सापडला. त्यांनी तो जप्त केला आहे. स्फोटकांचा साठा 103 किलोंचा आहे. साठा करण्याची परवानगी नसताना गोविंदसिंह याने साठा केल्याने त्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी दहशतवाद विरोधी पथकाकडे सातार्‍याला रवाना केले आहे.

या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जिलेटनच्या स्फोटकांचा साठा लॉकडाऊनच्या काळात गोविंदसिंह याने कोठून उपलब्ध केला. त्याचा पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी गोविंदसिंह राजपूत याच्याविरोधात आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.