मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात (Anvay Naik case) कोणतेही पुरावे मिळाले नसून याप्रकरणाची चौकशी थांबवण्यात यावी, असा क्लोझर रिपोर्ट न्यायालयात सादर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची आता चौकशी होणार आहे. याप्रकरणी तत्कालीन तपास अधिकारी अनिल पारसकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Police officers who file closure report in Anvay Naik case will face probe)
काही दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळीही न्यायमूर्ती एम.एम. शिंदे यांनी अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणाच्या तपासावर ताशेरे ओढले होते. नाईक कुटुंबीयांना अंधारात ठेवून क्लोझर रिपोर्ट सादर करण्यात आल्याचे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणाचा तपास थांबवण्याच्या निर्णयाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केलाच नसल्याचे मत गृहमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता रायगडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक अनिल पारसकर आणि सुरेश वराडे हे गोत्यात येण्याची शक्यता आहे. तर अनिल पारसकर यांच्यावर कारवाईची शक्यताही व्यक्त होत आहे.
सुशांतची सुसाईड नोट नव्हती, मात्र माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णवचं नाव, तरीही कारवाई का नाही? सुशांतसिंह राजपूतची सुसाईड नोट नव्हती, मात्र माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्वण गोस्वामी यांचं नाव आहे, तरीही कारवाई का केली गेली नाही? असा सवाल आज्ञा नाईक यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता.
सातत्याने पाठपुरावा करुनही योग्य चौकशी करण्यात आली नाही. उलट आमच्यावरच सूडबुद्धीनं खटला दाखल केल्याचा आरोप लावण्याचा प्रयत्न झाला. रायगडचे तत्कालीन पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडून आम्हाला सातत्यानं तपास सुरु असल्याचं सांगितलं गेलं. पण त्यात कुठलीही प्रगती झाली नाही, अशी खंतही नाईक कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविली होती.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय?
मुंबईतील सुप्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच ठिकाणी त्यांची आई कुमुद नाईक (84) यांचाही मृतदेह आढळून आला होता. तसेच त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती.
अन्वय नाईक हे इंटिरिअर डिझाईनर होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय यांच्या कॉनकॉर्ड कंपनीने रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी डिझाईनिंगचे काम केले होते.
हे काम पूर्ण झाल्यानतंरही नाईक यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नव्हते. कामाचे पैसे मिळवण्यासाठी अन्वय यांनी सातत्याने अर्णव गोस्वामींसह इतरांना विनंती केली होती. मात्र अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत होते.
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in