औरंगाबाद : शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायद्याच्या तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे. शासन व जिल्हास्तरावरुन कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु सध्या कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव विचारात घेता आज 21 रोजी श्रीरामनवमी उत्सवानिमित्त शासन परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना विहित करण्यात आलेल्या आहेत.
श्रीरामनवमी हा उत्सव संपूर्ण महारा्ष्टूात मोठया प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो. परंतु कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव विचारात घेता आज श्रीरामनवमी उत्सवानिमित्त औरंगाबाद जिल्हयातील सर्व जनतेला काय करावे आणि काय करु नये, याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सुनील चव्हाण यांच्यावतीने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे.
काय करावे, काय करु नये : कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारे शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे उल्लंघन करण्यात येऊ नये.
यावर्षी कोविड 19 चा प्रादुर्भाव पाहता श्रीरामनवमी साधेपणाने घरीच साजरी करावी, श्रीरामनवमीच्या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणूका काढण्यात येऊ नयेत, श्रीरामनवमीनिमित्त लोक मोठया प्रमाणात एकत्रित येवून साजरी करतात परंतु यावर्षी कोविड 19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता श्रीरामनवमी उत्सव साधेपणाने आपापल्या घरीच साजरा करावा, कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आलेली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही, मंदिरामधील व्यवस्थापक, विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादी व्दारे उपलब्ध करुन द्यावी, मंदिरात भजन, किर्तन, पठण इत्यादींचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे सार्वजनिक आयोजन करण्यात येवू नये.