कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यांच्या अर्ज छाननीत रयत आणि संस्थापक पॅनेलला मोठा धक्का बसलेला आहे. संस्थापक पॅनेलचे काले गटातून डाॅ. अजित देसाई आणि त्यांच्या पत्नी माजी संचालिका उमा देसाई तर रयत पॅनेलमधून महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे चुलते रघुनाथ श्रीपती कदम यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांनी सांगितले.
सातारा व सांगली जिल्ह्यातील 5 तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 305 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आज बुधवारी दि. 2 रोजी अर्ज छाननी करण्यात आली आहे. त्यामध्ये काले गटातून अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलला तर कडेगाव गटातून डाॅ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनेलला मोठा धक्का बसलेला आहे.
कृष्णा कारखान्यांची निवडणूक ही दुरंगी की तिरंगी होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यातच या दोन पॅनेलच्या दिग्गजांचे अर्ज बाद झाले आहेत. अर्ज छाननीत या दिग्गजांचे अर्ज बाद झाल्याने सत्ताधारी सहकार पॅनेलला यांचा फायदा मिळेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. परंतु हे निवडणुकीनंतरच किंवा दुरंगी की तिरंगी लढत होणार यावर सर्व अवलंबून आहे.
काले गटातून अर्ज छाननी विरोधात अपील
काले गटातून संस्थापक पॅनेलचे डाॅ. अजित देसाई, उमा देसाई आणि विकास देसाई या तिघांचेही अर्ज बाद करण्यात आले आहेत. मात्र संस्थापक पॅनेलकडून सायंकाळी उशिरा 5 वाजता अर्ज बाद विरोधात अपील करणार असल्याचे डाॅ. अजित देसाई यांनी सांगितले.
उमा देसाई यांचा एक अर्ज वैद्य तर एक बाद
डाॅ. अजित देसाई यांच्या पत्नी व माजी संचालक उमा देसाई यांनी सर्वसाधारण गटातून दाखल केलेला अर्जही कारखान्याला ऊस पुरवठा न केल्याच्या कारणास्तव अवैध ठरला आहे. मात्र महिला गटातून दाखल झालेला त्यांचा अर्ज मात्र वैध ठरविण्यात आला आहे.