सातारा | जवाहर नवोदय विद्यालय सातारा 2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावी प्रवेशाकरिता निवड परीक्षेसाठी दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी विद्यार्थ्यांनी त्वरीत ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन विद्यालयाच्या प्राचार्या ॲन्सी ए. जे. यांनी केले आहे.
या परीक्षेसाठी पात्रता पुढीलप्रमाणे राहील. सातारा जिल्ह्यातील शासनमान्य शाळेमध्ये विद्यार्थी इयत्ता पाचवी मध्ये शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये शिकत असावा. विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2011 पूर्वी व 30 एप्रिल 2013 नंतर झालेला नसावा. ही अट सर्वांसाठी तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनाही लागू आहे. सन 2020-21, 2021-22, 2022-23 मध्ये विद्यार्थी तिसरी, चौथी, पाचवी अनुक्रमे खंड न पडता उत्तीर्ण झाला पाहिजे. अनुसूचित जाती, जमाती आणि सर्व मुली, अपंग संवर्गासाठी व इतर मागास वर्गासाठी जागा राखीव आहेत. तसेच तृतियपंथीय उमेदवारसुध्दा नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीसाठी अर्ज करु शकतात. विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक. जर आधार क्रमांक नसेल तर पालकांचे जिल्ह्यातील रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
नवोदय निवडीसाठी परीक्षा शनिवार दि. 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11.30 वा. होईल. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रियेतून सोपी केली आहे. प्रवेश चाचणी परीक्षा 2023 साठी डेस्कटॉप, लॅपटॉप, मोबाईल, टॅबद्वारे http://navodaya.gov.in या वेबसाईटवरती लिंक उपलब्ध आहे.