हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारकडून नवीन वर्षाच्या निमित्ताने पुणेकरांना एक खास गिफ्ट मिळणार आहे. आता केंद्र सरकारने मेट्रोला निगडीपर्यंत वाढवण्यासही मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे नवीन वर्षामध्ये पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम सुरू होणार आहे. ज्यामुळे आता पिंपरी ते निगडीचा प्रवास देखील पुणेकरांसाठी सोपा होऊन जाईल.
केंद्र सरकारने पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो विस्तारीकरणाला मंजुरी दिली आहे. नुकतीच, पिंपरी ते निगडी या ४.५१९ किमी ऐलिव्हेटेड मार्गांच्या बांधकामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळेच आता नवीन वर्षात मार्गाच्या बांधकामाला देखील सुरुवात होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, केवळ 130 आठवड्यामध्ये प्रशासनाने बांधकाम पूर्ण करण्याचे मानस ठेवले आहे.
या नवीन मार्गावर चिंचवड स्टेशन, आकुर्डी आणि निगडी ही स्थानके असणार आहेत. थोडक्यात पुणेकरांना निगडी ते कात्रज थेट मेट्रो मी येणार आहे. दरम्यान, पुणे मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट या प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. आता पिंपरी ते शिवाजीनगरपर्यंत मेट्रो सुरु झाली आहे. त्यामुळे शिवाजीनगर ते स्वारगेटपर्यंतच्या मार्गाच्या कामाने जोर धरला आहे. हे काम एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. मुख्य म्हणजे या मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर, पिंपरी चिंचवड ते स्वारगेट प्रवास मेट्रोने करता येणार आहे.