कोल्हापूर प्रतीनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील 20 गावांसाठीच्या 224 कोटींच्या सुधारित गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या प्रशासकीय मान्यता द्यावी अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्यासोबत मुंबई येथे झालेल्या बैठकीत केली.यावेळी योजनेबद्दल सविस्तर आढावा घेण्यात आला. 15 दिवसांनी याबद्दल पुन्हा बैठक घेण्यात येईल असे मंत्री ना.पाटील यांनी सांगितले. बैठकीत बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले की, दक्षिण मतदारसंघातील 20 गावांसाठीच्या या पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी 224 कोटी रुपयांचा सुधारित आराखडा शासनाला सादर केला आहे .
हा आराखडा मंजूर झाल्यास या 20 गावांच्या पाणीटंचाईचा प्रश्न मिटणार आहे. याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी कंदलगाव, पाचगाव, मोरेवाडी, तामगाव, नेर्ली, हालसवडे, सांगवडे,सांगवडेवाडी, वसगडे, उंचगाव, गांधीनगर,कणेरीवाडी,चिंचवाड, गडमुडशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, कळंबा या गावातील ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन पाणीटंचाईबद्दल मते जाणून घेतली आहेत.तसेच सुधारित योजनेतून 35 नव्या टाक्या होणार असून माणसी 70 लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.त्यामुळे या योजनेला शासनस्तरावर लवकर प्रशासकीय मान्यता मिळावी, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जीवन प्राधिकरण तसेच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.तसेच याबद्दल 15 दिवसात पुन्हा बैठक घेऊ असे सांगितले.यावेळी मोरेवाडीचे माजी सरपंच अमर मोरे, सुनील शिंदे, विनायक हिरेमठ यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.