सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
वर्षातून एकदा जुलै महिन्यात तुम्हा, आम्हा सर्वांचं वृक्षप्रेम चांगलंच उफाळून येत. कोण कुठं, कोण कुठं झाड लावून त्याचे सेल्फी टाकतो. कुणी फेसबुक, सोशल मीडियावर आम्ही एवढी झाड लावली म्हणून सांगतो. मात्र या सर्वच पर्यावरण प्रेमी मंडळींचं झाडांचं प्रेम नाटकी असल्यासारखं वाटत. झाड लावून गेल्यावर वर्षभर परत ते झाड जिवंत आहे कि नाही हे बघायची सुद्धा तसदी कोणी घेत नाही. प्रशासनाच तर काय सांगूच नका आम्ही इतकी झाड लावली म्हणून गाजावाजा करायचा. कागदोपत्री जिवंत दाखवायची. पुढल्या वर्षी त्याच खड्यात नवीन झाड लावून वृक्षप्रेम दाखवलं जात.
आरवडे तासगाव तालुक्यातील एक आदर्श गाव. या गावाची १२ एकर गायरान जमीन तासगावच्या वनविभागान वृक्षलागवडीसाठी घेतलीय. गेल्या वर्षी या क्षेत्रावर १९०० झाड वन विभागानी लावली आणि विषय संपला. ‘झाड ‘ पावसाळा आहे तोपर्यंत जिवंत राहिली आणि उन्हाळ्याची सुरवात झाल्यावर पाण्यासाठी सुकू लागली. वनविभाग लक्ष देईना. आणि पुरोगामीचा वारसा असणाऱ्या घरातील संभाजी मस्के पाटील यांनी देव धर्म करून पैसे वाया घालवण्यापेक्षा झाडांना पाणी घालून त्याच पुण्य घेऊया असे सांगत झाड जगवा निसर्ग वाचवा असे आवाहन केले. गावच्या तरुणाईने त्याला प्रतिसाद दिला. १७ जानेवारीला गावातील मुलांनी पाण्याच्या बाटल्या भरून प्रत्येक झाडाजवळ ठेवल्या त्यातून महिनाभर तग धरला. ऊन वाढू लागल तसं झाडांना पाण्याची अधिक गरज भासू लागली.
गावातील पोरांनी वाढदिवस झाडांच्या सानिध्यात साजरा करून त्याचा खर्च पाणी घालायला टँकरला दिला. ज्याला कुणाला मदत करायचीय त्यान टँकर चालकाच्या खात्यावर पैसे भरायचे. एका राउंडला सहा टँकर पाणी या १६०० रोपांना लागत. वड, पिंपळ, आंबा, फणस, चिंच, लिंब, यांसह अनेक झाड पाणी असल्यानं त्या भकास माळावर हिरवीगार आहेत. भविष्यात त्या ठिकाणी जंगल होईल व त्या माळाला पुन्हा वैभव येईल. गावानं ठरवलं तर काय होऊ शकत याच उत्तम उदाहरण म्हणजे आरवडे. पर्यावरण प्रेमाचा दिखावा करणाऱयांनी झाड लावली किती यापेक्षा ती जगवली किती? हे त्यांनी सांगावं.