कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
मलकापूर व कराड शहराच्या हद्दीवर रहदारीच्या सर्व्हिस रस्त्यावर गॅस पाईपलाईन खुदाईचे काम सुरू असून हे काम अत्यंत मंद गतीने सुरू आहे. याबरोबरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना याठिकाणी करण्यात आलेल्या नसून वाहतुकीची मोठी समस्या या ठिकाणी निर्माण होत आहे. ठेकेदाराने मनमानी पध्दतीने गॅस पाईपलाईनचे काम केले असून लोकाच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे.
सर्व्हिस रस्त्यावर पाईपलाईन मशिनद्वारे टाकण्यासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. यामुळे रस्त्यावर मातीचे ढिगारे असून वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. बऱ्याच वेळा रस्त्यावर चिखल होऊन वाहने घसरून पडण्याचे ही प्रकार घडत आहेत. या खुदाईमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी सदरचे रस्ते खुदाई चे काम पूर्ण करावे अन्यथा आंदोलनात्मक पद्धतीने हे काम बंद पाडले जाईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
सदरचे निवेदन शिवसेनेचे नितीन काशीद, मधुकर शेलार, नीलेश सुर्वे, नरेंद्र लोहार, संजय चव्हाण, दिलीप यादव व शिवसैनिकांच्या वतीने रस्ते विकास महामंडळ अधिकारी मलकापूर नगरपरिषद तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.