जयंत पाटलांचा राज ठाकरेंना सवाल : गुजरात आणि उत्तरप्रदेशातील भोंगे कमी झालेत का?

Jayant & Raj T

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राज्यात हनुमानचालीसा आणि मशिंदीवरील भोंगे या विषयावरून वातावरण तापलेले आहे.  लोक राज ठाकरे यांना ओळखून आहेत. गुजरात आणि उत्तरप्रदेश येथील मशिदीवरील भोंगे कमी झालेत का? असा प्रतिसवाल राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना केला आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची परिसंवाद यात्रा साताऱ्यात आली असून याची सुरुवात वाई तालुक्यातून झाली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी भोंगे कुठे लावा, कुणाच्या मशिदीसमोर लावा हे काय आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश येथील मशिदीवरील भोंगे कमी झाले आहेत का? आगामी निवडणुकीत राज ठाकरे यांचा मुद्दा महाविकास आघाडीला डिस्टर्ब करू शकणार नाही.

कोल्हापूरात 23 तारखेला शरद पवार परिसंवाद यात्रेला उपस्थित राहणार

आमचा पक्ष संघटना विस्कटलेली नसून संघटनेशी संवाद हा या परिसंवाद यात्रेचा उद्देश आहे. राज्यात परिसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्या पाटण येथून सांगली व पुढे 23 तारखेला कोल्हापूर अशी परिसंवाद यात्रा होणार आहे. कोल्हापूर येथे पक्षाचे नेते शरद पवार हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.