कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोरोनामुळे लग्नाला येऊ नका पण लग्नाचा आहेर मात्र पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला न चुकता जमा करण्याचे आवाहन करत अनोखा लग्नसोहळा आज कोल्हापूरात पार पडला. कोरोनामुळं केवळ सासू-सासरे आणि आई-वडिलांच्या उपस्थितीत सैन्य दलात कर्तव्य बजावणाऱ्या जवानाने आपले लग्न उरकले.
गमतीचा भाग म्हणजे गडहिंग्लज तालुक्यातील अर्जुनवाड इथला हा लग्न सोहळा पाहुणे मंडळींनी फेसबुक लाईव्ह द्वारे अनुभवत वधू वराना शुभाशीर्वाद दिलेत. सैन्यदलात असलेल्या अविनाशचा ८ मे रोजी विवाहसोहळा होता. मात्र तत्पुर्वी त्याला ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश मिळाल्याने त्याला कर्तव्यास जाणे भाग होते. त्यामुळे कोरोना लॉकडाऊनच्या काळात लग्न करण्याची वेळ या फौजीवर आली. अविनाशने लॉकडाऊनचे नियम पाळत केवळ त्याचे आई-वडील आणि आपले सासू-सासरे यांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, हे करत असताना अविनाशने सामाजिक भान राखत लग्नाला येऊ न शकलेल्या आपल्या नातेवाईक आणि आप्तेष्टांना आहेर न देता कोरोनाच्या लढाईसाठी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केलं. सीमेवर देशाच्या शत्रूशी दोन हात करणाऱ्या या जवानाचा कोरोनाशी लढाईत सुद्धा तितकाच उत्साह पाहून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. दरम्यान, कोरोनाच्या बाबत प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन करत मास्क बांधूनच अविनाशने लग्न केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”