सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके
सैनिकी परंपरा लाभलेल्या सातारा जिल्ह्यातील अपशिंगे मिलिटरी गावचे सुपुत्र सुधीर सूर्यकांत निकम यांचे कर्तव्य बजावत असताना दुःखद निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवाला लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सातारा पोलिसांच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून जवान सुधीर यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. यावेळी ‘भारत माता की जय, वीर जवान अमर रहे’ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी वीर जवान सुधीर निकम यांना अभिवादन करत श्रद्धांजली वाहिली.
शहीद जवान सुधीर निकम हे गुजरात जामनगर येथे सेवा बजावत होते. त्यांना शारीरिक त्रास जाणवू लागल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असताना त्यांची प्रकृती खालवत जाऊन त्यांची काल (मंगळवारी) प्राणज्योत मालवली. 8 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये कार्यरत असणाऱ्या जवान सुधीर निकम यांच्यावर आज सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी फुलांनी सजवलेल्या लष्कराच्या गाडीतून त्यांची अंत्ययात्रा गावातून काढण्यात आली.
गावातील मुख्य ठिकाण असलेल्या विजय स्तंभ येथे अंत्ययात्रा आल्यानंतर त्या ठिकाणी मिलिटरी परेड होऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सुधीर निकम यांचे वडील सूर्यकांत निकम यांना देखील 1995 मध्ये सिक्कीम येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आले होते. त्यांच्यानंतर काल त्याचे सुपुत्र सुधीर निकम याचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय असा परिवार आहे.