खासगी सावकारास अटक : शेतकऱ्यास 50 हजाराच्या बदली 16 लाखाची मागणी

Phaltan Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | निंबळक येथील एका शेतकऱ्याला व्याजाने दिलेल्या पन्नास हजार रुपयांचे 3 लाख 50 हजार घेऊनही 16 लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. पैसे न दिल्यास तारण जमिनीची विक्री करण्याची धमकी देत शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या एका खासगी सावकाराच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास अटक केलेली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवनाथ सदाशिव राणे (रा. कोळकी, ता. फलटण) याच्याकडून रामदास एकनाथ पिसाळ (रा. निंबळक, ता. फलटण) यांनी 2010 मध्ये दरमहा 10 टक्के व्याजदराने 50 हजार रुपये निंबळक (ता. फलटण) येथे घरी घेतले होते. त्याच्या मोबदल्यात पिसाळ यांनी संशयित आरोपीस 2010 ते 2016 पर्यंत वेळोवेळी मिळून 1 लाख 50 रुपये व त्यानंतर 2017 ते 2021 पर्यंत 2 लाख रुपये म्हणजे अकरा वर्षांत मुद्दलाच्या सातपट पैसे रोख स्वरूपात दिले.

तरी देखील संशयित आरोपी राणे आजपर्यंतच्या व्याजापोटी फिर्यादीस आणखी सोळा लाख रुपये बेकायदेशीररीत्या मागत होता. ते न दिल्यास तारण म्हणून राणे याच्या नावे करून दिलेली जमीन पुन्हा माघारी न करता परस्पर तिऱ्हाईत व्यक्तीला विकण्याची धमकी देत होता. शिवीगाळ करत होता. पिसाळ यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर नवनाथ राणे यास अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही. अरगडे तपास करीत आहेत.