गांजाप्रकरणाचा अनुभव असल्याने मलिकांना वाईन बाबतची घोषणा करण्याची जबाबदारी दिली असावी; भाजपचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता दुकानात आणि सुपरमार्केटमध्येही वाईन मिळणार आहे. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून मंत्री नवाब मलिक यांनी काल जाहीर केले. त्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी सरकार वर टीका करत नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हंटल की, गांजाप्रकरणात असलेला अनुभव लक्षात घेऊन वाईन बाबतची घोषणा करण्याची जबाबदारी नवाब मलिक यांना दिली असावी, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावरून सरकारला धारेवर धरले. महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच ठाकरे सरकारला दिलाय. महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारनं गरिबांना थोडी तरी मदत करावी. पेट्रोल-डिझेलऐवजी दारु स्वस्त! दारुबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी! महाराष्ट्रात नवीन दारुविक्री परवाने देण्याचा निर्णय! आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू! महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाचे वाभाडे काढले.