सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगलीतल्या शामरावनगर मध्ये राहणाऱ्या महिला सावकाराच्या मुसक्या आवळण्यात पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या पथकाला यश आले. सुवर्णा माणिक पाटील असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून महागड्या गाड्या, पैसे, कोरे चेक असा एकूण १ लाख ७७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे. महानगरपालिकेच्या गरजू कामगारांच्या असहाय्यतेचा फायदा उचलून त्यांना अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे देऊन वसुली सुरु केली होती.
संशयित सुवर्णा पाटील हि पहिल्यापासून सावकारी परवाना घेवून त्या परवान्यांचा भंग करून कोरे स्वाक्षरी केलेले चेक घेणे, उसनवर पावतीवर स्वाक्षरी घेणे, कोरे बॉन्ड घेणे, लोकांची वाहने तारण ठेवूण घेणे अशा प्रकारे सावकारी करून मोठया प्रमाणात व्यवहार करत होती. सुवर्णा पाटील या महिलेने म.न.पा. विभागाच्या कर्मचाऱ्यांना टारगेट करून त्यांचेकडून मोठया प्रमाणात सावकारीतून वसूली केली आहे.
सध्या काही कामगारांकडे तिने मोठया रक्कमांची मागणी करून ते दिले नाही तर कोर्टातील १३८ च्या कलमाखाली केसेस करेल, तुमच्या घरावर जप्ती आणेल वगैरे धमक्या देवून तसेच वेळ पडल्यास स्त्री असल्याचा फायदा घेवून स्त्रियांचे कायदे वापरून कारवाई करेन अशी धमकी देवून खंडणी मागणीचे कृत्य करीत होती. याबाबतची तक्रार पिडीतांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सावकारी सेलकडे केली. या तक्रारीची शहनिशा करून सावकारी सेलच्या पथकाने तिच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी तिच्याकडे २७ हजार २०० रुपये रोख, एक मोबाईल, एक ज्युपिटर गाडी, एक चार चाकी कार, एक ऍक्टिव्हा गाडी, कोरे चेक, २५ ते ३० कोरे बॉण्ड तसेच उसनवार ६० ते ७० खरेदी दस्त असा एकूण १ लाख ७७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.