सांगली | मिरज रोडवर असणारे सिनर्जी हॉस्पिटल कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता या रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अँटीजेन चाचणीचे बनावट रिपोर्ट विकताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे.
स्वप्निल सुरेश बनसोडे असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. अँटीजेन टेस्ट न करता फक्त आधार कार्डच्या माहितीच्या आधारे एक हजार रुपये घेऊन स्वप्निल बनसोडे हा निगेटिव्ह रिपोर्ट देत होता. त्याने अजून किती लोकांना कोविडचे बनावट रिपोर्ट दिले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
पोलिस या प्रकरणाची कसून चाैकशी करत आहेत. बनसोडे याच्या बरोबर रुग्णालयातील आणखी कोण डॉक्टर जर दोषी असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिला आहे. तसेच या चाचणीचे रिपोर्ट हे ई पास साठीच अनेकांनी नेले असल्याचा खुलासा चौकशीतून झाल्याचे त्यांनी सांगितले.