हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील हवा सध्या दूषित झाली आहे. प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता घसरु लागली आहे. या समस्येवरुन सत्ताधारी आम आदमी सरकारवर टीका केली जात असल्याने या टीकेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिले आहे. “दिल्लीतील वायू प्रदूषण आणि हवेची खराब गुणवत्ता या केवळ राष्ट्रीय राजधानीच्याच समस्या नाहीत. ही समस्या केवळ कृषीप्रधान पंजाब आणि दिल्ली या राज्यांपुरती मर्यादीत नाही. त्यामुळे दिल्लीतील हवेच्या खराब गुणवत्तेबाबत राजकारण व आरोप-प्रत्यारोपांचा खेळ केंद्र सरकारने थांबवावा, असे म्हणत केजरीवालांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सोबत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, दिल्लीतील हवेच्या खराब गुणवत्तेबाबतचा आरोप-प्रत्यारोपांचा खेळ केंद्र सरकारकडून केला जात आहे. मात्र, राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांचा खेळ करण्याची ही वेळ नाही. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनेही पावलं उचलण्याची वेळ आहे.
दिल्लीत हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असल्यामुळे येथील सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. शुक्रवारी सकाळी एअर क्वालिटी इंडेक्स 472 वर पोहोचला होता. हवेच्या गुणवत्तेचे प्रमाण 450 च्या वर गेल्यानंतर फुप्फुसासाठी धोकेदायक समजले जाते. त्यामुळे उद्यापासून दिल्लीतील प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.