Sunday, June 4, 2023

जोपर्यंत मागण्या मान्य नाही, तोपर्यंत संप सूरूच राहणार : महसूल कर्मचाऱ्यांचा इशारा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसापासून संप सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने कराड येथील महसूल कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधण्यासाठी प्रशासकीय कार्यालयाच्या पायरीवर बसून निदर्शने करीत घोषणाबाजी केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप हा सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

सहाय्यकांची रिक्त पदे भरावीत, अव्वल कारकून व मंडलाधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा. या प्रमुख मागण्यांसाठी कराडात महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरूच ठेवला आहे. या संपामुळे अनेक सामान्य नागरिकांची विविध प्रकारची कामे रखडली असुन विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संपामुळे उत्पनाचे दाखले पालकांना मिळत नसल्याने आरटीईचे प्रवेश रखडले आहेत.

कराडात महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपामुळे गेले आठ दिवस अनेक कामे ठप्प झाली असून शालेय विद्यार्थ्यांचे ही अनेक कामे रखडली आहेत. या संपाचा ग्रामीण मधील नागरिकांना चांगलाच फटका बसला आहे. अनेक जण मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात हेलपाटे मारू लागले आहेत. आज सकाळी महसूल कर्मचाऱ्यांनी पुन्हा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रशासकीय कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निदर्शने केली.