औरंगाबाद – राज्यातील खासगी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, आश्रमशाळांमध्ये तब्बल 24 लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करणारी याचिका ब्रीजमोहन मिश्रा यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. त्यानंतर खंडपीठाने ऑनलाइन पद्धतीने आधार कार्डसोबत जोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. या आकडेवारीनुसार तब्बल 19 लाख विद्यार्थी बोगस असल्याचे आढळले.
राज्यातील 36 जिल्ह्यांतील एक लाख 10 हजार 315 शाळांमध्ये सुमारे दोन कोटी 25 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी संख्या दाखविण्यात आली आहे. ‘आधार’ला जोडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या एक कोटी 83 लाख विद्यार्थी आहे. त्यात 29 लाख 72 हजार 636 विद्यार्थ्यांची आधार जोडणी न झाल्याचे आढळले. राज्य सरकारतर्फे पोषण आहार, मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके इतर आनुषंगिक योजनांचा लाभ दिला जातो. लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध नसेल तर गैरप्रकार होण्याची शक्यता असते. विविध कारणामुळे शाळांनी विद्यार्थिसंख्या जास्त दाखल्याची शक्यता आहे.
सर्वाधिक बोगस विद्यार्थी –
2,43,582 – पुणे
1,84,262 – नागपूर
1,72,534 – जळगाव
1,52,723 – नांदेड
1,17,519 – यवतमाळ