किसनवीर कारखान्याच्या अध्यक्षपदी आ. मकरंद आबा, उपाध्यक्षपदी प्रमोद शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | किसन वीर सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद लक्ष्मणराव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी प्रमोद भानुदास शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. कारखान्याच्या निवडणुकीत 19 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलने सर्व 21 जागांवर तब्बल 9 ते 9500 हजारांच्या मतांच्या फरकांनी जिंकल्या.

किसनवीर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 69 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर बचाव शेतकरी परिवर्तन पॅनेल विरूध्द माजी आमदार, भाजपा नेते मदन भोसले यांचे शेतकरी विकास पॅनेल अशी लढत झाली. किसनवीर बचाव शेतकरी परिवर्तन पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत सत्तांतर घडविले होते.

या निवडणुकीत मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ शेतकरी विकास पॅनलला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. कारखान्याच्या निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 46 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. याशिवाय चार अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. सत्तांतर करत एकतर्फी निवडणुकीत विजय मिळवल्याने आता आ. मकरंद पाटील यांच्यावर सभासदांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

आज झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर आ. मकरंद पाटील आणि उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा बॅंकेचे चेअरमन आणि किसनवीर कारखान्याचे संचालक नितीन काका पाटील, शशिकांत पिसाळ यांच्यासह संचालकांनी सत्कार केला.

Leave a Comment