पुणे । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं लोकांच्या सार्वजनिक सण-समारंभ, उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले. लॉकडाउनच्या काळात गुढीपाडवा, रमजान सारखे सण घरात बसून साजरे करण्याची वेळ आली. कोरोनाच्या संसर्गावर अजूनही नियंत्रण मिळवता आलं नाही आहे. अशातच लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला. मात्र अजूनही पुढे काय होणार यावर अनिश्चितता आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळख असलेल्या पंढपूरच्या विठुरायाची आषाढी वारी कोरोनाच्या संकटामुळं होणार कि नाही यावर आता प्रश्नचिन्ह तयार झालं आहे. कारण ज्या पुणे, पिंपरी-चिंचवड भागातून आषाढी वारीची पालखी मार्गस्थ होते तो रेड झोनमध्ये आहे. तुकोबांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यात मुक्कामी असते. ज्या ठिकाणी या पालख्यांचा मुक्काम असतो ते ठिकाण सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. त्यामुळे पालखीचं स्वरुप कसं असावं यावर विचार होणं गरजेचं असल्याचं वारकऱ्यांचं म्हणणं आहे.
चैत्रवारीपासून माऊलींच्या आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याची तयारी सुरु होते. पण यावर्षी ते सगळं ठप्प आहे. महाराष्ट्रभरातून येणारे दिंडी प्रमुख, वारकरी यांच्या मनात आषाढी वारीच्या नियोजनाबाबत संभ्रम आहे. त्यामुळे शासनाने यावर स्पष्टता द्यावी अशी मागणी होते आहे. यावर्षी संत मुक्ताई पालखी सोहळा प्रस्थानाची तारीख 27 मे आहे. देहूमधील संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान नियोजित तारीख 12 जून आहे. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान नियोजित तारीख 13 जून आहे. त्यामुळे अगदी तोंडावर आलेल्या या उत्सवाची रुपरेषा ठरवण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचलावित असं वारकऱ्यांचं म्हणणं. यंदाची वारीचं स्वरूप हे शासनाच्या निर्णयावरचं अवलंबून असल्याचं वारकरी म्हणाले. याआधी लॉकडाउनच्या काळात गेल्या एप्रिल महिन्यात चैत्रवारी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आषाढीसाठी राज्यभरातून जवळपास 150 ते 200 पालखी सोहळे येत असले तरी यात प्रामुख्याने सात मानाच्या पालख्यांचे महत्त्व संप्रदायात असते. याच ७ पालख्यांसोबत जवळपास 10 ते 15 लाख वारकरी पायी चालत पंढरपूरला येतात. या प्रमुख पालख्यांपैकी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचे पालखी सोहळे पुणे परिसरातून येतात. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे कोरोनाचे मोठे संकट असल्याने हा रेड झोन करण्यात आला आहे. त्यामुळं पालखी सोहळा आयोजनास मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यातच इतक्या मोठया संख्येत लोकांनी पालखी सोहळ्यानिमित्त एकत्र येणं म्हणजे कोरोनाच्या संसर्गाला चालना देण्यासारखी स्थिती निर्माण करणं.
दरम्यान, इतिहासाची पाने चाळून पाहिल्यास यापूर्वी 1896 साली प्लेगची साथ आली होती तेव्हा देखील ब्रिटिश सरकारने आषाढी आणि इतर पालखी सोहळे रद्द करुन प्रातिनिधिक स्वरुपाची यात्रा केल्याचं सांगितलं जातं. यंदाचा धोका खूपच मोठा आहे. पंढरपूर परिसरात कोरोनाला अद्याप शिरकाव करता आलेला नसला तरी सोलापूर शहरात कोरोनाचा फास आवळत चालला आहे. अशावेळी आषाढी यात्रेबाबत शासनाला तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे, जेणेकरुन राज्यभरातील लाखो भाविकांच्या मनातील संभ्रम दूर होऊन चित्र स्पष्ट होईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”