शिक्षण मंत्री आशिष शेलार बहुमताने ‘पास’!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा विजय मिळवलाय. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शेलार २५ हजार ९०० पेक्षा जास्त मताधिक्यान विजयी झालेत. वांद्रे पश्चिम मतदारसंघात कमी मतदानाची नोंद झालेली असतानाही आशिष शेलार यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे. वांद्रे पश्चिम सारख्या बहुभाषिक मतदारसंघात कोणे एके काळी काँग्रेसची सत्ता होती. मात्र २०१४ मध्ये भाजपन खेचून आणलेल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शेलार मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत.

आशिष शेलार यांच्याविरोधात केवळ तीनच उमेदवार होते. काँग्रेसचे आसिफ जकेरिया शेलारांना कडवी झुंज देतील असं मानलं जात होतं. भाजपला डोकेदुखी ठरणाऱ्या चाळीस जागांमध्ये वांद्रे पश्चिम मतदारसंघाचा समावेश होता. याशिवाय बसपा आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. मंत्रिमंडळ फेरबदलात विनोद तावडे यांच्याकडील शालेय शिक्षण मंत्रिपदाची धुरा काढून आशिष शेलार यांच्याकडे सोपवण्यात आली होती. निवडून आल्यावर फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात शेलार यांच्याकडे कोणती जबाबदारी असणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Leave a Comment