मुंबई | विधानसभा निवडणूका लोकसभा निवडणुकांसोबत न होता मागे पुढे झाल्या तर राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत येईल अाणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री होतील अशी भविष्यवाणी ज्योतिष परिषदेमधे वर्तवण्यात आली आहे. ठाणे येथील ब्राह्मण सभा मंडळात काल ज्योतिष अधिवेशन पार पडले. त्यावेळी २०१९ च्या निवडणुका या सत्रात सिद्धेश्वर मारकटकर यांनी काही राजकीय भाकिते केली. यावेळी २०१९ मधे कोणता पक्ष सत्तेत येईल?, मुख्यमंत्री कोण बनेल? भाजप शिवसेनेची युती टिकेल का? राष्ट्रवादी आणि काँग्रेस ची आघाडी होईल का? आदी प्रश्नांवर ज्योतिष मारकटकर यांनी भविष्यवाणी केली.
केंद्रातील लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या तर भाजप पुन्हा सत्तेत येईल. देवेंन्द्र फडणवीस यांची पत्रिका चांगली असून ते केंद्रात जातील आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील असे भाकित ही यावेळी करण्यात आले. राज्यातील सध्याचे असंतोषाचे वातावरण थंड होण्यास आॅक्टोबर महिणा उजाडेल असा अंदाज मारकटकर यांनी वर्तवला असून २०१९ ला नरेंन्द्र मोदीच पंतप्रधान होतील असेही त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांचा यावेळी पंतप्रधान होण्याचा योग नसला तरी काँग्रेस येत्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करेल व जास्त मते मिळवेल असेही या परिषदेत सांगण्यात आले आहे.