मुंबई प्रतिनिधी । शिवसेना खासदार संजय राऊत प्रकृती अस्वस्थामुळे लीलावती रुग्णालयात सध्या भरती आहेत . राऊत यांच्यावर हृदयविकार शस्त्रक्रिया केल्याने त्यांच्या तब्बेतीच्या चौकशीसाठी राजकीय नेते लिलावतीला दाखल झाले. आज काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण, विश्वजित कदम आणि माणिकराव ठाकरे यांनी राऊत यांची भेट घेत त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली.
या भेटीत अशोक चव्हाण यांनी राऊत यांचे जोरदार अभिनंदन केलं. चव्हाण यांनी राऊत यांच्या हातात हात देत ‘जोरदार किल्ला लढवला’ असे उद्गार काढत त्यांना एकप्रकारे शाबासकी दिली. तसेच भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांनी आम्ही केवळ राऊत यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. याभेटीत कुठल्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे सांगत योग्यवेळी बैठका घेतल्या जातील अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तसेच संजय राऊत यांची भूमिका राज्याला आवडली असल्याचे सांगत त्यांनी राऊत यांचे कौतुक केले.
दरम्यान राज्यातील सत्तापेचप्रसंग अजूनही संपला नाही आहे. गेल्या काही दिवसापासून माध्यमामध्ये केवळ एक नावं ठळकपणे घेतलं जात होतं ते म्हणजे संजय राऊत यांचं. मात्र, ऐनवेळी संजय राऊत यांना लीलावतीमध्ये भरती करण्यात आले. तपासणीअंती त्यांच्यावर ‘ओन्जोप्लास्टी’ शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान राऊतांची चौकशी करण्यासाठी युती आणि आघाडीतील नेते लिलावातीला भेट देत आहेत. काल भाजपचे आशिष शेलार, छगन भुजबळ यांनी राऊत यांची भेट घेतली होती.