हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या आशिया कप 2023 च्या आयोजनाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. खरं तर यावर्षीच्या आशिया कपच्या आयोजनाचा अधिकार पाकिस्तानला आहे, परंतु पाकिस्तानमध्ये खेळण्यास भारतीय संघाने नकार दिल्यामुळे हा मुद्दा अजूनही अडकला आहे. मात्र आता यावर ठोस उपाय निघाला आहे. त्यानुसार आशिया कप पाकिस्तानमध्येच आयोजित केला जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय संघाला ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाण्याचीही गरज भासणार नाही.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, पाकिस्तान या स्पर्धेचे यजमानपद भूषवू शकतो आणि भारताचे सामने इतर काही परदेशी ठिकाणी आयोजित केले जाऊ शकतात. रिपोर्ट मध्ये असे म्हटले आहे की BCCI आणि PCB आता या ठरावाच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि दोन्ही संघ पाकिस्तानबाहेर एकमेकांना भिडू शकतात. म्हणजेच आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाकिस्तानच्या बाहेर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचे सामने संयुक्त अरब अमिराती, ओमान किंवा श्रीलंका येथे होऊ शकतात.
दरम्यान, आशिया चषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार आहे. यावेळीही आशिया चषक स्पर्धेत फक्त 6 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि एक क्वालिफायर संघ असेल. २ गटात या ६ संघाची विभागणी होईल. त्यानुसार गटांतर्गत या 6 संघांमध्ये एकूण 6 सामने खेळवले जातील. त्यानंतर दोन्ही गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीत 4 संघांमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने एकूण 6 सामने खेळवले जातील. यानंतर दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील आणि त्यांच्यामध्ये विजेतेपदाचा सामना खेळला जाईल.