हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित ‘मायलेक’ या आगामी नव्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण… या चित्रपटात झळकणाऱ्या खऱ्या मायलेकी. टिझरमधून आपण त्यांची सुंदर केमिस्ट्री पाहिली. आता टिझरनंतर या चित्रपटातील पहिले जबरदस्त गाणे प्रदर्शित झाले असून यातून मायलेकींची मैत्री समोर येत आहे. ‘असताना तू’ असे या नव्या आणि सुंदर गाण्याचे बोल आहेत. हे सुरेख आणि हॅपनिंग गाणे पंकज पडघन यांनी गायले असून त्याला सावनी भट यांची साथ लाभली आहे.
‘हे’ कलाकार मुख्य भूमिकेत
पंकज पडघन यांचेच अफलातून संगीत लाभलेल्या या नव्याकोऱ्या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्यातून आई आणि मुलीच्या नात्यातील हृदयस्पर्शी बॅाण्डिंग दिसत आहे. प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत आपण एकमेकांसोबत आहोत, असा या गाण्याचा सार आहे. या आगामी चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. या आई आणि लेकीची सुंदर केमिस्ट्री १९ एप्रिलला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. या गाण्याबद्दल सोनाली खरे म्हणते, ‘अगदी खरं सांगायचे तर माझ्या आणि मायरावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे आम्हा दोघींना अगदी तंतोतंत जुळते. आमचे प्रत्यक्षात असेच गोड नाते आहे. कदाचित त्यामुळेच आमच्यातील ही केमिस्ट्री पडद्यावर नैसर्गिक दिसत असावी. गाणे रॉकिंग असल्याने रेकॉर्डिंगलाही प्रचंड धमाल आली. मुळात गाण्याची टीम अतिशय हॅपनिंग आहे. आई आणि मुलीमधील सुंदर नाते उलगडणारे हे गाणे आहे’.




