हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रागाच्या भरात एखादी व्यक्ती काय करेल याचा नेम नाही. अशीच एक हादरवून सोडणारी घटना साताऱ्यात मंगळवारी उघडकीस आली आहे. आत्तीने जेवण दिले नाही या कारणातून संतापलेल्या भाच्याने काठीने मारहाण करत वृध्द आत्तीचा खून केला आहे. सातारा तालुक्यातील बसापाचीवाडी येथे ही घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी संशयिताला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
वत्सला नामदेव बाबर (वय ७०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हरिभाऊ सुरेश चव्हाण (वय ३०, दोघे रा. बसापाचीवाडी ता. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बसपाचीवाडी येथे आत्ती वत्सला नामदेव बाबर व त्यांचा भाचा हरिभाऊ सुरेश चव्हाण हे दोघे एकत्र राहत होते. हरिभाऊ गावातच काही कामे करत होता. त्याला मद्यपानाचे व्यसन असल्यामुळे नेहमी दोघांमध्ये भांडण होत होती. सोमवारी रात्री उशीरा त्याने जेवण मागितल्यानंतर आत्तीने त्याला जेवण दिले नाही. त्यामुळे त्याने लाकडी दांडक्याने आत्तीला मारहाण केली. या हल्ल्यात वृद्ध आत्ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.
ही घटना मंगळवारी समोर आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. परिसरातील लोकांनी याबाबतची माहिती सातारा तालुका पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून संशयिताला दुपारी ताब्यात घेतले. पोलिसांचा घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. दुपारी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली आहे.