कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील तारूख येथे भांड्याच्या जुन्या कपाटाची जास्त किंमत सांगीतल्याच्या रागातून एकाला मारहाण करण्यात आली. सदरची घटना मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जखमी विक्रमसिंह धनाजी कुऱ्हाडे यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारूख येथील जयसिंग सवादकर यांचे भांड्याचे जुने कपाट विकायचे होते. लहू शिरतोडे हा ते कपाट विकत घेण्यासाठी आला होता. त्यावेळी सवादकर यांनी विक्रमसिंह यांना बोलाऊन कपाट किती रूपयांना विकावे, अशी विचारणा केली. विक्रमसिंह यांनी कपाटाची दीड हजार रुपये किंमत सांगितली.
त्यामुळे चिडून जाऊन शिरतोडे याने विक्रमसिंह यांना डोक्यात लाकूड मारून जखमी केले. याबाबतची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. विक्रमसिंह कुऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून लहू शंकर शिरतोडे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.