उस्मानाबाद प्रतिनिधी | उस्मानाबादमधील शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कळंब येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत एका तरुणाकडून चाकू हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी याठिकाणी ही घटना घडली असून हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं आहे. ओमराजेंच्या घड्याळावर हा वार झाला असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. कार्यकर्त्यांनी लागलीच या तरुणाला चोप दिला आहे. दरम्यान आपण बिलकुल ठीक असल्याचं ओमराजे यांनी सांगितलं आहे.
हल्ल्यामागचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. उस्मानाबादमध्ये पदमसिंह पाटील, त्यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह यांचा निंबाळकर कुटुंबियांशी वाद आहे. मराठवाड्याच्या राजकारणात ‘कानामागून आला आणि तिखट झाला’ अशी काहीशी अवस्था निंबाळकरांच्या बाबतीत झाली होती. पवनराजे निंबाळकर खून खटल्यानंतर हे प्रकरण आणखी चिघळलं होतं. जगजितसिंह यांचं उस्मानाबदमधील तिकीट कापलं जाऊन त्यांना तुळजापूर मतदारसंघ देण्यात आला होता. या हल्ल्यामागे दोन घराण्यातील वाद आहे का? हे अद्यापही समोर आलं नाही.