वाहतूक पोलिसाने 7500 रुपये दंड मागताच युवकाकडून आत्मदहनाचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा येथील मुख्य बसस्थानक परिसरात वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या भरमसाठ दंडाच्या बिलाला कंटाळून रागाच्या भरात एका वाहनधारकाने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रकार केल्याची घटना सोमवारी घडली. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडून गेली. अखेर पोलीस व नागरिकांनी प्रसंगावधान साधत त्या युवकाला पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

सातारा येथे सध्या वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई केली जात आहे. कारवाई करत असताना संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांकडून ठराविक रक्कम दंड स्वरूपात मागितली जात आहे. त्यानंतर दंडाची पावतीही वाहनधारकांना दिली जात आहे.

वाहतूक पोलिसाने ७५०० रुपये दंड मागताच युवकाकडून आत्मदहनाचा प्रयत्न ;घटनेमुळे परिसरात एकच खळबळ

दरम्यान, सोमवारी वाहतुक पोलीस सोमनाथ शिंदे हे सातारा बसस्थानक परिसरात वाहनचालकांवर कारवाई करत असताना त्यांनी ट्रिपलसीट चाललेल्या दुचाकी चालकाला अडवून 7500 रुपयांचा दंड मागितला. यावेळी जवळ पैसे नसल्याचे कारण देत युवकाने आपण वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याचे कबुल करत दंड भरण्यास नकार दिला. तसेच “मी कोरोनातून नुकताच बरा झालो असून 2 महिने झाले नोकरी नाही. अशात माझी आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, असे दुचाकीचालकाने सांगितले. मात्र, तरीही वाहतूक पोलीस दंड वसूल करण्यावर ठाम राहिल्याने त्याची आणि वाहतूक पोलीस शिंदे यांची बाचाबाची झाली.

यावेळी संबंधित युवकाने रागाच्या भरात अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता त्याला पोलिस आणि नागरिकांनी पकडले. दरम्यान या घटनेनंतर युवकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून वाहतूक पोलिसांनी पैश्याची मागणी केल्याचा आरोप युवकाने केला आहे. त्याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Leave a Comment