जिल्हा कारागृहात CCTV फोडण्याचा प्रयत्न; कैद्यास 2 वर्षांची सक्तमजुरी

Satara Jail News (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अनेक घटना घडत आहेत. बंदीवानांमध्ये किरकोळ कारणांवरून वादावादी होतेय. आता तर एका कैद्याकडून कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी बंदी विकास भीमराव बैले (वय ३१, रा. कुशी, ता. पाटण) याला जिल्हा न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २ एप्रिल २०२२ रोजी दुपारी सवा दोन वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृह वर्ग २ येथे एक कैद्याकडून सीसीटीव्ही फोडण्याचा हा प्रकार घडला. कारागृहातील शिपाई प्रभाकर माळी हे खोली क्रमांक १४ येथे गेल्यावर त्यांना आरोपी विकास बैले याने हातातील बेडी काढून शाैचालय साफ करण्याच्या ब्रशने ट्यूबलाईट फोडल्याचे दिसून आले. तसेच खोलीच्या दरवाजावर चढून सीसीटीव्ही फोडण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे शिपाई माळी यांनी सहकारी सखाहरी शिंदे यांना बोलवून घेत बंदी असणाऱ्या बैलेच्या हातातील ब्रश काढून घेतला. तसेच त्याला संबंधित कृत करण्यापासून थांबविले.

यावेळी बैलेने माळी आणि शिंदे यांना धक्काबुक्की केली. तसेच याच सीसीटीव्हीमुळे तुम्ही माझ्यावर गुन्हा नोंद केला. यातून तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवता. आता लक्ष कसे ठेवता ते बघू ? असे तो म्हणाला. यावरुन प्रभाकर माळी यांनी संबंधित आरोपीविरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन सातारा शहर पोलिस ठाण्यात शासकीय मालमत्ता नुकसान आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. या खटल्याचा निकाल जिल्हा न्यायालयात लागला. चाैथे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. व्ही. चतूर यांनी विकास बैले याला दोषी धरुन शासकीय कामात अडथळा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दाेन वर्षे सक्तमजुरी आणि ४ हजार रुपये दंड. तसेच दंड न दिल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अॅड. नितीन मुके यांनी काम पाहिले. पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस उपनिरीक्षक अविनाश पवार आणि हवालदार अजित फरांदे यांनी कामकाज पाहिले. तर प्राॅसिक्यूशन स्काॅडचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत, उपनिरीक्षक सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक शशिकांत गोळे, हवालदार गजानन फरांदे, मंजूर मणेर, रहिनाबी शेख, राजेंद्र कुंभार, अमित भरते यांनी सहकार्य केले.