औरंगाबाद – डबल डेकर स्मार्ट शहर बस घेण्यासोबतच रिक्षांचे इलेक्ट्रिक रिक्षांमध्ये परिवर्तन व इ-सायकलला चालना देण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचा प्रयत्न राहील, असे महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या शहर सल्लागार समितीची बैठक सोमवारी स्मार्ट सिटी कार्यालयात पार पाडली. यावेळी स्मार्ट सिटीतर्फे सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. पांडेय यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले. त्यात पूर्ण झालेली कामे, सुरू असलेली कामे, भविष्यातील प्रकल्पांची माहिती दिली.
मास्टर सिस्टम इंटीग्रेटर, ई गव्हर्नर्स, जीआयएस सर्व्हेक्षण, कौशल्य विकास प्रकल्प, ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व सौंदर्यिकरण, पादचारी मार्गासह सायकल ट्रॅक, स्ट्रीट फॉर पिपल, स्मार्ट सिग्नल, स्मार्ट बस याची माहिती पांडेय यांनी दिली. खासदार इम्तियाज जलील व माजी महापौर नंदकुमार घोडेले, काँग्रेसचे माजी गटनेते भाऊसाहेब जगताप, नाथव्हॅलीचे प्राचार्य रणजीत दास, आर्किटेक्ट हारेस सिद्दीकी, शहर अभियंता सखाराम पानझडे व स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते.