पोलीस दखल घेत नसल्याने कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद – शेजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीची दखल पोलिस प्रशासन घेत नसल्याने फुलंब्री येथील कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. यासाठी या कार्यालयाच्या झाडावर गळफास घेण्यासाठी दोरही टाकला होता. दरम्यान पोलिसांनी कुटुंबाची समजूत काढून तक्रार देण्यासाठी फुलंब्री पोलिस ठाण्यात पोलिसांच्या वाहनाने पाठवण्यात आले.

याबाबातच्या निवेदनात फुलंब्री येथे विठ्ठल रखुमाई मंदिरामागे राहणाऱ्या शोभा राजू बिरसने यांनी म्हटले आहे की, आम्ही भाड्याच्या घरात राहतो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्री मुलांनी दारात फटाके वाजवले व गाणे गात असताना शेजारी राहणाऱ्या लोकांनी विरोध करून आम्हाला शिवीगाळ केली. त्यानंतर लोकांचा समूह त्या ठिकाणी जमा झाला असता, मी घाबरून पोलीस ठाणे फुलंब्री यांना फोन करून संपर्क साधला व माहिती दिली. मात्र पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. तसेच जमलेल्या काही लोकांनी मला व माझ्या पतीला मारहाण करून दोघांचे कपडे फाडले असा आरोप शोभा बिरसने यांनी निवेदनात केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे हे कुटूंब आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी व सिटी चौक पोलिस ठाणे यांना देण्यात आली. सिटी चौक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्या कुटूंबाची भेट घेऊन समजूत काढली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देऊन तक्रार नोंदण्यासाठी अर्जदार शोभा राजू बिरसने व त्यांच्या कुटूंबियांना पोलिस वाहनात बसवून फुलंब्री पोलीस ठाण्याकडे रवाना करण्यात आले.