हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज 7 मे 2024 रोजी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यात सोलापूर आणि म्हाडा मतदारसंघाचाही समावेश असल्यामुळे येथे सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महत्वाचे म्हणजे, या मतदान प्रक्रियेदरम्यान सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन (EVM Machine) पेट्रोल जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे मतदार केंद्रावर चांगलाच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून बागलवाडी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी लोकांची लगबग सुरू झाली होती. ही मतदान प्रक्रिया शांततेत सुरू होती. परंतु अशातच मतदान करण्यासाठी आलेल्या एका मतदाराने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे ईव्हीएम मशीनचे थोडे नुकसान झाले. यानंतर काही वेळासाठी मतदान प्रक्रिया ही थांबवण्यात आली होती. परंतु घडलेल्या प्रकाराबाबत माहिती देण्यास केंद्रावरील अधिकाऱ्यांनी नकार दिला.
बागलवाडी मतदान केंद्रावर हा सर्व प्रकार घडल्यानंतर पुन्हा नवीन ईव्हीएम मशीन बसवण्यात आली. तसेच मतदान केंद्रावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, आज बारामती, सांगली, कोल्हापूर, रायगड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, माढा, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि हातकणंगले अशा 11 मतदारसंघांतील मतदान केंद्रावर मतदान प्रकिया पार पडली. यात सोलापूर मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, उज्वलाताई शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम यांनी मतदानाचा हक्क बजावला.