रायगड | किल्ले रायगडावरील छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळी बाबासाहेब पुरंदरे यांच्या मानवी अवशेष असलेल्या हाडाला राख आणि चंदनामध्ये मिसळून महाराजांच्या समाधीला लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी ही गोष्ट घडल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात पुण्यातील काही लोकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य युवती सरचिटणीस पूजा झोळे व सहकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत पूजा झोळे यांच्याशी हॅलो महाराष्ट्रने थेट संपर्क साधला असता त्यांनी सदर घटनेचा निषेध नोंदवला. तसेच रायगड येथे काही लोकांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थीला चंदन आणि राख लावली आणि मंत्रतंत्र म्हंटले त्यानंतर हळद कुंकू लावून त्या अस्थी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला लावत असतानाच आम्ही तिथे पोहचून त्यांचा डाव उथळून लावला असे पूजा यांनी हॅलो महाराष्ट्रसोबत बोलताना सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, सदर लोकांना एकूण प्रकाराबाबत विचारलं असता त्यांनी आपण पुस्तकाची पूजा करत आहे असे म्हणत काहीही उलटसुलट उत्तरे देण्यास सुरुवात केली. हा एकूण सर्व प्रकार घडत असताना संबंधित व्यक्तींकडे राख, चंदन आणि अस्थी सापडल्या. तसेच तेथील पर्यटकांनी देखील या अस्थीच असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील 5 किल्ल्यावर असा प्रकार करण्यात आला असल्याचा आरोप यावेळी पूजा झोले यांनी केला. या एकूण गैरप्रकारानंतर महाड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्यातील 4 जणांना ताब्यात घेतले तर एक जण फरार आहे. पोलीस प्रशासनाने हा प्रकार करण्याचा प्रयत्न करणारे समाजकंटक कोणाशी संबंधीत आहेत? या मानवी अस्थी कोणाच्या आहेत? याचा तपास करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी पूजा झोळे यांनी केली.