औरंगाबाद – सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी अनिवार्य राज्य पात्रता परीक्षा (सेट) रविवारी शहरातील 18 केंद्रांवर पार पडली. या परीक्षेला 7 हजार 723 परीक्षार्थींना पैकी 6 हजार 288 जणांनी परीक्षा दिली तर 1 हजार 435 जण अनुपस्थित होते. यावेळी पहिल्या सत्राचा पेपर सोपा होता. मात्र, दुसऱ्या सत्रातील पेपर ने घाम फोडला असे म्हणत परीक्षार्थी केंद्राबाहेर पडले.
रविवारी सकाळी 7 वाजेपासूनच परीक्षा केंद्राबाहेर परीक्षार्थींनी हजेरी लावली. सकाळी 8 वाजेपासून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारांवर ओळखपत्राची पडताळणी करून प्रवेश देणे सुरू झाले. प्रत्यक्ष बैठक खोलीत नऊ वाजेपासून प्रवेश द्यायला सुरुवात झाली. दोन सत्रात झालेल्या परीक्षेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मासची सक्ती करण्यात आली होती. तसेच हातांवर सॅनीटायझर चा फवारा आणि थर्मल गनने तपासणी करून विद्यार्थ्यांना अंतराने केंद्रात प्रवेश दिले गेले.
पहिल्या सत्राचा पेपर 10 ते 11 दुसऱ्या सत्राचा पेपर 11:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत होता. पहिल्यापेक्षा दुसऱ्या पेपरने घाम फोडल्याचे विद्यार्थ्यांनी केंद्रातून बाहेर पडताना सांगितले. तर पहिल्या पेपरच्या सामान्य ज्ञानाने ही कस लावल्याचे विद्यार्थी म्हणाले. या परीक्षेला उपस्थितीचे प्रमाण 81.42 टक्के तर अनुपस्थितीचे प्रमाण 18.58 टक्के होते, अशी माहिती सेट परीक्षेचे समन्वयक डॉ. सतीश दांडगे यांनी दिली आहे.