सातारा | जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने आता इच्छुकांच्या नजरा 13 जुलै रोजी होणाऱ्या सोडतीकडे लागल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील आरक्षण सोडतीची प्रक्रिया 7 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत पूर्ण होणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेत नव्या गट व गणांची वाढ झाल्याने एकूण 73 जिल्हा परिषद गट, तर पंचायत समितीचे 146 गण आहेत. त्यामुळे जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार नवीन रचनेनुसार प्रक्रिया होणार आहे. उद्या गुरूवार दि.7 जुलैपासून ही प्रक्रिया सुरू होणार असून, 13 जुलै रोजी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित जागा निश्चितीसाठी सोडत काढण्यात येणार आहे.
आरक्षण सोडतीनुसार 15 जुलै रोजी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यानुसार 15 ते 21 जुलै या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना सादर केल्या जाणार आहेत. 25 जुलैला सोडतीवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अभिप्रायासह राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करावयाच्या आहेत. 29 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोग प्राप्त हरकती व सूचनांवरील जिल्हाधिकाऱ्यांचे अभिप्राय विचारात घेऊन आरक्षणास मान्यता देणार आहे. दि. 2 ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली जाईल.
राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समितीसाठी सोडत
राज्यात 25 जिल्हा परिषदा व 284 पंचायत समितीसाठी या सोडती होणार आहेत. जिल्हा परिषद गटासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समितीचे आरक्षण तालुक्यातील तहसीलदार कार्यालयता जाहीर करण्यात येईल.