कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
श्रेयवाद हा महत्वाचा नसून जनतेच्या विकासकामांसाठी सक्रीय रहाणे महत्वाचे आहे. श्रेयवाद घडवून सामान्य माणसांची चेष्टा करण्याऐवजी विकासाची तळमळ महत्वाची असते, असे मत राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केले. या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी कोम कोणाचे अन् श्रेय कोणाचे हा फलक राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून लावण्यात आला होता. त्यामुळे या फलकाची चर्चा चांगलीच रंगली असून हा टोला नक्की कोणाला हा पाटणच्या जनतेला न समजण्या इतकी दुधखुळी नाही.
कोरीवळे (ता.पाटण) येथे खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जलजिवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आबासो शिंदे, पाटण अर्बन बॅंकेचे माजी व्हा.चेअरमन शिवाजीराव शिंदे, भराडीदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सारंग पाटील म्हणाले, पाटण तालुक्याला श्रेयवाद नवा नाही. मात्र यातून सामान्य माणसांची थट्टा केली जात असून सामाजिक एकोपाही धोक्यात येतो. राजकारणात स्पर्धा असावी परंतू ती निकोप असावी. बिनबुडाचे खोटे श्रेयवाद घेण्यापेक्षा लोकांना अपेक्षित असलेला विकास करण्यासाठी जर पुढाकार घेतला तर ते लोकांना जास्त आवडेल. प्रत्येक कामाचे प्रशासकीय पातळीवर पत्रव्यवहार, कागदपत्रे त्याला आलेली उत्तरे असतात. त्याच्या आधारेच बोलले गेले पाहिजे, श्रेयवादाचे दावे केले पाहिजेत. मात्र श्रेयवादात जास्त वेळ खर्च न करता विकासकामांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. खा.श्रीनिवास पाटील हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या जलजीवन मिशन, ग्रामसडक व विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी सातारा लोकसभा मतदार संघासाठी उपलब्ध करून दिला जात आहे. यातून सर्वांगीण विकासाचे उद्दीष्ट साधले जात आहे.
आबासो शिंदे म्हणाले, खा.श्रीनिवास पाटील हे सर्वसामान्य लोकांच्यात मिसळणारे नेतृत्व आहे. त्यांना सामाजिक, राजकीय व प्रशासकीय अनुभव मोठा असल्याने त्याचा फायदा नागरिकांना होत आहे. त्यांच्या माध्यमातून सातारा लोकसभा मतदारसंघात विकासाचा ओघ सुरू असून त्यासाठी सारंग पाटील हे देखील प्रयत्नशील आहेत. प्रारंभी स्वागत सुरेश पुजारी यांनी केले. आभार संतोष शिंदे यांनी मानले. यावेळी माजी सरपंच अनिल शिंदे, नवनाथ शिंदे, मारूलचे उपसरपंच गणपतराव पाटील, शंकर नांगरे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.