कराड जनता बॅंकेच्या दोन इमारतीचा लिलाव : वाई, कराडातील मालमत्ताचा लिलाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड जनता सहकारी बँकेच्या येथील रविवार पेठेतील मुख्य शाखेसह वाईतील शाखेच्या इमारतींचा लिलाव अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी जाहीर केला आहे. यापूर्वी दोन वेळा हाच लिलाव जाहीर करण्यात आला होता. मात्र, त्याला काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तिसऱ्यांदा दोन्ही इमारतींचा लिलाव जाहीर केला आहे. त्या दोन्ही लिलावातून तब्बल 4 कोटी 44 लाखांचा निधी उभा राहणार आहे.

तीन वर्षांपूर्वी कराड जनता बँकेची दिवाळखोरी रिझर्व्ह बँकेने जाहीर केली. बँकेवर त्यापूर्वीच आर्थिक बंधने आली होती. बँकेचे व्यवहार पुन्हा संशयास्पद वाटल्याने बँकेची थेट दिवाळखोरी जाहीर झाली. त्यापूर्वी बँकेच्या संचालक मंडळासह 30 जणांविरोधात 310 कोटींचा अपहार केल्याची तक्रार सभासद आर. जी. पाटील यांनी केली होती. त्याच्या पोलिस तपासाचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याबाबत ईडीकडेही तक्रार दाखल असून, त्याही यात्याद्वारे तपास सुरू आहे. बँकेच्या शासकीय ऑडिटला स्थगिती आहे, अशी स्थिती असतानाच बँकेच्या इमारती आता लिलावात काढण्यात आल्या आहेत. येथील रविवार पेठेतील मुख्य शाखेच्या इमारतीचा लिलाव जाहीर झाला आहे.

रविवार पेठेत बँकेच्या मालकीची 185.53 चौरस मीटरच्या जमिनीवर 816.92 चौरस मीटरचे बांधकाम आहे. त्याच्या लिलावाची किंमत 3 कोटी 17 लाख इतकी जाहीर झाली आहे. वाईत गणपती आळीत बँकेच्या मालकीची 206.78 चौरस मीटरची इमारत आहे. त्याची किंमत 1 कोटी 17 लाख इतकी लिलावात जाहीर केली आहे. ऑनलाइन पद्धतीने निविदा देण्याचे आवाहन केले आहे. त्या निविदा 10 मार्च रोजी फोडण्यात येणार आहेत.