औरंगाबाद – देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण खूप कमी झाले आहे, अशा जिल्ह्यांमधील उपाययोजनांची आढावा बैठक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी जिल्ह्यात लसीकरण वाढवण्यासाठी काय काय उपाययोजना आखल्या आहेत, याची माहिती दिली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्यासह इतर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीदेखील उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याने 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. मात्र आजही अनेक जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. औरंगाबदमध्येही सोमवारपर्यंत जिल्ह्यातील 23 लाख 80 हजार 175 लोकांनी पहिला तर 07 लाख 28 हजार 435 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. हे प्रमाण फक्त 22.59 टक्के एवढे आहे. देश पातळीवर तुलना करता ज्या जिल्ह्यांचे लसीकरण कमी झाले आहे, अशा 45 जिल्ह्यांचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. 50 टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेल्या सर्व जिल्ह्यांचा आढावा यावेळी नरेंद्र मोदी यांनी घेतला. यात महाराष्ट्रातील औरंगाबाद, हिंगोली, लातूर, नंदुरबार, बुलडाणा, अकोल्याचा समावेश आहे.
दरम्यान, पंतप्रधानांच्या या आढावा बैठकीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी लसीकरण वाढवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन कवच कुंडल अभियान राबवून लसीकरण सुरु केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.