व्यापाऱ्यांवरील कारवाईने खासदार भडकले; जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा प्रशासकांवर डागली तोफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोना निर्बंध असतांना छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या शहरतील शेकडो छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यावर जिल्हाधिकरी, पोलिस आयुक्त व महापालिका प्रशासकांनी कारवाई करत दुकांना सील ठोकले. शिवाय लाखो रुपयांचा दंडही वसुल केला. या कारवाईचा मोठा गवगवा देखील करण्यात आला. परंतु महापालिकेने सील केल्यानंतर अवघ्या दोन तासांत शहरातील एक प्रसिध्द मिठाई भांडार उघडण्यात आले. यावरून खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त निखील गुप्ता, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्यावर तोफ डागली आहे.

कुणाच्या दबावाखील येऊन संबंधित मिठाईचे दुकान उघडण्यात आले, कुणाकुणाला मिठाई मिळाली, असा सवाल देखील इम्तियाज यांनी सोशल मिडियांच्या माध्यमातून केला आहे. गेल्या महिनाभरापासून शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. व्यवसाय बुडाल्याने अनेक छोटे व्यापारी हतबल झाले आहेत. पावसाळा तोंडावर असल्याने दुकानात पाणी शिरून मालाचे नुकसान होण्याची भिती व्यक्त करत व्यापाऱ्यांनी दिवसांतून काही तास दुकाने उघडण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती.

या पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील, शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, असे निवेदन घेऊन गेले होते. मात्र ३१ मे पर्यंत ते शक्य नसल्याचे सांगण्यात आले.तर दुसरीकडे दुकांना सील केल्यानंतर काही तासांत ते उघडण्यात आल्याचा प्रकार घडल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला. यावरून त्यांनी स्थानिक राजकीय पक्षाचे नेते, जिल्हाधिकारी,पोलीस आयुक्त,महापालिका प्रशासक यांच्यावर जोरदार टीका करत कारवाईत भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला आहे.

खा.इम्तियाज जलील म्हणाले, एकीकडे ज्या छोट्या व्यापाऱ्याचे घर दुकानावर चालते त्यांची दुकाने सील केली जात आहेत. त्यांच्याकडून दंड वसुल करून प्रशासन आपली मर्दुमकी गाजवत आहेत. दुसरीकडे दारूच्या दुकांनामधून मात्र सर्रास अवैधपणे विक्री होत असतांना त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.मोठ्या धन्नासेठ व्यापाऱ्यांना सूट आणि गरींबावर कारवाई असा प्रकार कदापी खपवून घेतल जाणार नाही. नियम सगळ्यांसाठी एकच हवा,मात्र प्रशासनातील बडे अधिकारीच दबावाखाली काम करत असल्याचे दिसत आहे.

एका सत्तावीस वर्षीय रिक्षाचालकाने आत्महत्या केली. लाॅकडाऊन आणि निर्बंधांमुळे त्याला रिक्षा चालवता येत नव्हती, तर दुसरीकडे गाडीच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी बॅंकांकडून तगादा सुरू होता. याला कंटाळून त्याने गळफास लावून घेतला. पण राज्याचे मुख्यमंत्री व जिल्ह्यातील प्रशासनाला याचे सोयरसुतक नाही. केवळ बैठका घ्यायच्या आणि आम्ही हे केले, ते केले सांगून स्वतःची पाठ थोपटवून घ्यायचे हाच प्रकार दर आठवड्याला सुरू आहे. त्यामुळे उद्या, सोमवारी होणाऱ्या बैठकीला मी निषेध म्हणून न जाण्याचा निर्णय घेतला आहे.२७ वर्षीय तरुण रिक्षाचालकाने आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करायला मी जाणार आहे, असेही खा. जलील म्हणाले.

मुख्यमंत्री साहेब गरीबांचा विचार करा…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला नियमांचे पालन करण्याचे आवाहन करतात, लोकांकडून त्यांचे ऐकले देखील जाते. पण मग जे गरीब व्यापारी, दुकानदार, रिक्षाचालक धंदा नाही म्हणून घरात बसून आहेत. त्यांच्यासाठी काही तरी करा, असे आवाहन देखील इम्तियाज जलील यांनी केले. लाईट बीलमध्ये माफी, कर्जाच्या हप्त्यावरील व्याज माफी असे निर्णय घेऊन सामान्यांना देखील दिलासा द्या. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही टिव्हीवर याल तेव्हा या लोकांसाठी देखील काही घोषणा करा, असा टोला देखील इम्तियाज यांनी लगावला.
आम्हाला रस्त्यावर उतरून दुकाने उघडी करायला भाग पाडू नका,असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. २३ मे २०१९ रोजी म्हणजेच दोन वर्षापुर्वी ज्या जनतेने मला मला निवडून दिले, त्या जनतेसाठी आवाज उठवणे माझे कर्तव्य आहे, मी इतर राजकीय लोकप्रतिनिधी, नेत्याप्रमाणे मुग गिळून गप्प बसणार नाही,

                                                                            -खासदार इम्तियाज जलील 

Leave a Comment