औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. भोंगा सध्या आरोप-प्रत्यारोपाचा मुद्दा ठरला आहे. अशातच आता न्यायालयाने निवडणुकांचे कार्यक्रम सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातही नगरपालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती ‘निवडणुकांचा भोंगा’ वाजण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट, गणांची प्रारूप प्रभाग रचना 22 जूनला अंतिम करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे आठ गट वाढ झाली असून एकूण गटांची संख्या 70 होणार आहे.
ओबीसी आरक्षणावरून काही महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित होत्या. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नगरपालिकांचा रखडलेला प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम आणि ग्रामपंचायतींच्या रखडलेल्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आता जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या गट, गणांच्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकतीच यासंदर्भात मुंबईत बैठक झाली. यात नकाशे तसेच लोकसंख्येची माहिती घेण्यात आली. यानुसार प्रारूप प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम करण्यात आला आहे.
असा आहे प्रभाग रचनेचा कार्यक्रम –
•प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करणे – 23 मे
•प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे – 31 मे.
•प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे – 2 जून.
•हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी- 2 ते 8 जून
•प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी देऊन निवडणूक विभाग/निर्वाचक गण रचना अंतिम करणे- 22 जून.
इच्छुकांची पुन्हा धावपळ सुरू –
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या आजी-माजी सदस्यांसोबत अनेक नवख्या इच्छुकांनी कंबर कसली होती. मात्र, मध्येच कार्यक्रम रखडल्याने या सर्वांनी प्रचाराची धावपळ कमी केली होती. आता पुन्हा निवडणुकीच्या गट, गणांचे प्रारूप आराखड्याचा कार्यक्रम जहीर झाल्याने निवडणुका लागण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची पुन्हा धावपळ सुरू होणार आहे.