औरंगाबाद – शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी डबल डेकर इलेक्ट्रिक शहर बस सुरू करण्याची सूचना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच केली आहे. त्यासाठी बेस्टची मदत घ्या, असेही ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईला जाऊन डबल डेकर बसची पाहणी केली. बेस्टच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता, तब्बल दीड वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल, असे सांगण्यात आले. यासंदर्भात लवकरच निविदा काढली जाणार आहे.
शहरांचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवावा, यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या शहर बसच्या ताफ्यात पाच इलेक्ट्रिक शहर बसची भर पडणार आहे. दरम्यान पाच इलेक्ट्रिक कार स्मार्ट सिटीने खरेदी केल्या आहेत. या निर्णयाचे आदित्य ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या दौऱ्यात कौतुक केले होते. तसेच शहरात पर्यटन वाढीसाठी डबल डेकर इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी इलेक्ट्रिक डबल डेकर बस खरेदी करण्याची तयारी सुरू केली. मुंबईत बेस्टने इलेक्ट्रिक डबल डेकर बस खरेदी केल्या आहेत. तसेच 900 बस खरेदीसाठी निविदा काढली आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी स्मार्ट सिटीचे पथक नुकतेच मुंबई येथे जाऊन आले. ज्या कंपनीकडून या बसेस खरेदी केल्या जाणार आहेत, त्या कंपनीकडे दीड वर्षाची वेटींग आहे, अशी माहिती बेस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या संदर्भात उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम् यांनी सांगितले, की मुंबई महापालिकेला इलेक्ट्रिक डबलडेकर बसेससाठी नऊ महिन्याचे वेटिंग आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटीला 20 इलेक्ट्रिक बस खरेदी करायच्या आहेत. त्यानुसार स्मार्ट सिटीने निविदा काढण्याची तयारी केली आहे. पण तब्बल दीड वर्ष वाट पाहावी लागणार आहे. 20 डबल डेकर बसेससाठी निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर जो दर येईल, त्याचा विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण या बसची किंमत जास्त आहे.